४. अमरधाम भागातील सांडपाणी सध्या थेट कृष्णा नदीत मिसळते.
शेरीनाला शुध्दीकरणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. शेरीनाला सांडपाणी शुध्दीकरणाची एक योजना मध्यंतरी मांडण्यात आली होती. त्यामध्ये सांगली शहराचे सांडपाणी दोन ठिकाणी शुध्दीकरण संयंत्राद्वारे शुध्द करून कृष्णा नदीत सोडण्याचे योजिले होते. परंतू या योजनेमध्ये दोन त्रुटी होत्या. एक विजेचा अतिरिक्त वापर व शुद्धीकरण पूर्णत: झाले नाही तर नदीच्या पाण्याचे प्रदूषण होण्याची शक्यता. सांडपाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी क्लोरिन वापरल्यास पाण्यामध्ये क्लोरोऑरगॅनिक संयुगे तयार होण्याची शक्यता असते. अशी संयुगे कर्करोगाला कारणीभूत असतात. यामुळेच राष्ट्रीय नदी कृति संचालनालयाने या योजनेला मंजुरी दिली नाही. त्यानंतर अन्य पर्यायांचा प्रस्ताव वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केला. यामध्ये सर्व सांडपाणी एकत्र करून सांगलीपासून दूर धुळगांव येथे पंप करून नेणे व तेथे त्यावर कमी खर्चाची, वीज न लागणारी शुध्दीकरण प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी वापरणे अशी तरतूद होती.
या योजनेचा प्राथमिक अहवाल महाविद्यालयाने सादर केल्यानंतर एप्रिल १९९९ मध्ये त्याला तत्वत: मंजुरी मिळाली. या अहवालानुसार सदर योजनेचे सविस्तर व अंतिम अहवाल करण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे सोपविले. योजनेचा सविस्तर आराखडा, नकाशे, डिझाईन व खर्चाचा तपशील याचा अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला. नवी दिल्ली येथे राष्ट्रीय नदी कृति संचालनालयामध्ये या योजनेच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यांत आला व त्यामध्ये कांही बदल सुचविण्यात आले. त्याप्रमाणे सुधारणा करून योजना पुन्हा मंजुरीसाठी पाठविण्यात आली. आता या योजनेस शासनाची मंजुरी मिळाली असून आता प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात करावयाची आहे.