|
कृष्णा नदीला दरवर्षी पूर येतो आणि कांही प्रमाणात नदी स्वच्छ होण्याच्या दृष्टीने पूर यावयास पाहिजे. तथापि २००५-२००६ सालापासून सांगली शहर व परिसरासाठी पुराचे हे
स्वरूप बदलले आहे. पावसाचे प्रमाण थोडे फार वाढले तरी पुराचे पाणी नागरी भागात शिरण्याचे प्रमाण तसेच सुरक्षित पाणी पातळी ५४० मी. चे वर पुराचे पाणी येण्याचे प्रमाण
वाढले आहे. या पुराचे वैशिष्ट्य म्हणजे ही पूरपातळी १० दिवसांपर्यंत टिकून राहते. इतके दिवस नागरी भागात पाणी राहिल्याने इमारती धोकादायक बनतात. चीज वस्तूंचे नुकसान
होते. जनावरे दगावतात, रोगराई पसरते व मानवी जीवनावर याचा विपरित परिणाम होतो. सांगली जिल्ह्यात २००५ सालीच्या पुरांत रू. ५१.२६ कोटी शासनातर्फे मदत म्हणून
वाटले गेले तर सन २००६ मधील पूरपरिस्थितीमुळे रू. २९.०० कोटी मदत शासनातर्फे वाटली गेली. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज प्रत्यक्ष वाटलेल्या मदतीपेक्षा कितीतरी
जादा आहे.
कृष्णा नदीला कराडजवळ कोयना, सांगली ( हरिपूर)जवळ वारणा व नृसिंहवाडीजवळ पंचगंगा या मोठ्या नद्या मिळतात. त्यामळे सांगलीजवळ कृष्णा नदीला येणार्या पाण्यामध्ये
कोयना व कृष्णेच्या उपनद्या यांचे पाणी असते. तसेच हे येणारे पाणी साठविण्यासाठी कोयना, वारणा, धोम, बलकवडी ही मोठी धरणे तसेच अनेक मध्यम पाटबंधारे प्रकल्प व लघु
पाटबंधारे प्रकल्प बांधण्यात आले आहेत. पावसाळयांत धरणाच्या सांडव्यातून सोडावयाच्या पाण्याच्या नियंत्रणाची सोय फक्त मोठ्या धरणाच्या सांडव्यावरील वक्रद्वाराद्वारेच केली
जाते. अर्थात् त्याठिकाणी विसर्गही मोठ्या प्रमाणात असतो. धरणांच्या सांडव्यातून येणारे पाणी आणि धरणांपासून सांगलीपर्यंतच्या पाणूलोटक्षेत्रात पडणार्या पावसाचे पाणी असे
एकत्रित सांगली परिसरात येते व पूर येतो. मध्यम प्रकल्प व लघुपाटबंधारे प्रकल्प यांचा पावसाळयातील विसर्ग तसा पुराच्या दृष्टीने कमी असल्याने त्याचा म्हणावा तसा परिणाम
जाणवत नाही.
सांगली जिल्ह्यातून पुढे गेल्यानंतर नृसिंहवाडीजवळ पंचगंगा नदी कृष्णा नदीला मिळते. कृष्णा नदीला पूर असेल आणि त्याचवेळी पंचगंगेला पूर असेल तर पुराची तीव्रता वाढते.
पंचगंगा कृष्णा नदीला जवळजवळ काटकोनांत मिळते. त्यामुळे कृष्णा नदीला फुगवटा येतो. आणि त्याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्याला बसतो.
नृसिंहवाडीहून पुढे कृष्णा नदी कर्नाटकात जाते. |