सांगली आणि सांगलीकर हे पुस्तक श्री. अविनाश टिळक यांनी पूर्वार्ध, उत्तरार्ध आणि परिशिष्ट अशा तीन भागात लिहिले आहे. पूर्वार्धात सा रम्य नगरी या प्रकरणात सांगली नगरीचा इतिहास सांगितला आहे. सांगली नाव कसं जन्माला आलं इथंपासून दोनशे वर्षाचा इतिहास, सांगली नगरीची सर्वांगाने झालेली जडण-घडण, औद्योगिक, सांस्कृतिक विकास यांचा धावता आढावा घेतला गेला आहे.
दुसरा भाग हा खरा पुस्तकाचा आत्माच आहे. संथ वाहणार्‍या कृष्णा नदीच्या सांगली परिसरात, सांगलीचं नाव महाराष्ट्रात, भारतवर्षात आणि काही प्रमाणावर जागतिक स्तरावर उज्वल करणारी अनेक लहान थोर माणसं आपल्या कर्तृत्वाचा ठसा विविध क्षेत्रात उमटवून गेली आणि अजून उमटवित आहेत. एके काळी नगण्य असणार्‍या सांगलीला चेहरा-मोहरा कुणामुळे मिळाला असेल तर तो प्रथम १८०१ साली सांगली ही आपल्या संस्थानाची राजधानी बनवणार्‍या थोरल्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्यामुळे. पुढे थोरल्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धनांच्या दूरदृष्टीमुळे व उदार धोरणामुळे सांगलीची खरी भरभराट झाली. या दोघांच्या पायाभरणीवर खरा कळस चढविला तो लोकनेते चार वेळा महाराष्ट्रराज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवणार्‍या सांगलीच्या वसंतदादा पाटील यांनी. त्यांच्या कर्तृत्वामुळे सांगलीचं नाव महाराष्ट्रात आणि काही प्रमणात संपूर्ण देशात गाजले. सांगली नाट्यपंढरी म्हणून ख्यातकीर्त आहे.
 
*ज्ञानदीप - मराठी वेबसाईट
 
      आतापर्यंत १०० वेबसाईट विकसित