सांगली हे छोटेसे संस्थान. पटवर्धन हे येथील राजे. पटवर्धन राजेसाहेबांनी संस्थानातील जनतेला सर्वतोपरी सहाय्य केले. संस्थानाची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून राजेसाहेबांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. १९०८ साली चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन हे अज्ञान असल्यामुळे इंग्रज सरकारने बर्क या युरोपियन अधिकार्या ला प्रशासक म्हणून नियुक्त केले. चिंतामणराव सज्ञान होईपर्यंत त्यांनी संस्थानचा कार्यभार सांभाळला.
बर्कसाहेब प्रशासक असताना राजेसाहेब हे राजवाड्यात रहात असत. त्यावेळी राजवाडयाची कमान नव्हती. सध्याचे जिल्हाधिकारी कार्यालय हे राजेसाहेबांच्या दिवाणांचे कार्यालय म्हणून वापरले जात होते. राजवाड्याची कमान, त्याला लागून असलेली कोर्टाची इमारत व दगडी बांधकामातील इमारती या बर्कसाहेबांच्या कारकीर्दीत झाल्या. त्यावेळी सांगलीमध्ये अभियंते नव्हते. पण कंत्राटी पध्दतीने काम करणारे बाबू शेट्टी वडर हे संस्थानातील मोठे कंत्राटदार होते. त्याचबरोबर नरसिंगराव माळी नावाचे आणखी एक कंत्राटदार काम करीत होते. त्यावेळी त्यांनी बांधलेल्या दगडी इमारती आजही त्याच डौलाने उभ्या आहेत. या कंत्राटदारांना बांधकामासाठी जे मार्गदर्शन हवे असे, त्याठी राजेसाहेब मुंबईच्या गॅरिसन व बॅटली या दोन युरोपियन अभियंत्यांना बोलावीत असत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राजवाड्यासमोरील सांगली बँकेची इमारत कंत्राटदार साने यांनी बांधली. गणपती मंदिराचा सभामंडप मुंबईच्या मराठे, कुलकर्णी या वास्तुविशारदांच्या मार्गदर्शनाखाली झाला. गणपती मंदिराच्या महाद्वाराच्या डिझाईनसाठी दिल्लीचे प्रसिध्द वास्तुविशारद रानडे यांना बोलावले होते. त्यांचेच मार्गदर्शनाखाली महाद्वाराचे काम झाले.
१९३०-३५ च्या सुमारास श्री. भवरीलाल लड्डा यांनी बालाजी मिल सुरू केली. एक मजूर म्हणून काम करीत असलेल्या श्री. दादासाहेब वेलणकर यांनी त्याच सुमारास गजानन मिल सुरू केली आणि नावारुपास आणली. हजारो कामगारांना काम देणार्या या दादासाहेबांना लोक धनी वेलणकर या नांवाने संबोधू लागले.
१९१४ पूर्वी सांगली - मिरज कोल्हापूर अशी मीटर गेज रेल्वे सुरू होती. १९२२ च्या सुमारास पुण्याच्या व्ही. आर्. रानडे अँड सन्स या कंपनीने कृष्णा नदीवर पूल बांधला. या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी त्यावेळचे व्हॉइसरॉय आयर्विन हे आले होते. त्यांचेच नांव पुलाला देण्यात आले.