आपल्या भारतामध्ये आजच्या घटकेला अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने जितकी वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे जवळजवळ तितकीच आपल्या सांगली मिरजेमध्येही आहे. बहुतेक सर्व प्रकारचे तज्ञ आणि अतितज्ञ डॉक्टर्स आपल्या अद्यावत ज्ञानाचा लाभ जनतेस करून देत आहेत. दिवसेंदिवस त्यात भरच पडत आहे ही अभिमानाची व गौरवास्पद गोष्ट आहे. अशा वैद्यकसेवेचा गेल्या शंभर वर्षांचा मागोवा घेऊ लागले की आश्चर्याचा धक्का बसतो. त्यावेळचं सांगली गांव अत्यंत छोटं. श्रींमंत अप्पासाहेब पटवर्धनांनी वसवलेलं संस्थान. छोटाशा प्रजेच्या आरोग्यकल्याणासाठी तासगांव चिंचणी येथे वास्तव्य करीत असलेल्या श्री. कृष्णाजी विष्णू जोशी या वैद्यांची मुद्दाम नेमणूक करून त्यांच्या चरितार्थासाठी गणपती देवालयांतील सांबाच्या देवळाची देखभाल पूजाअर्चा करण्याची जबाबदारी त्यांचेवर सोपवली. त्यामुळे जोशी हे नाव मागे पडून सांबारे हेच नाव सर्वतोमुखी झाले आणि लौकिकास पात्र ठरले. हेच कृ . वि. जोशी आबासाहेब सांबारे झाले.सांगलीच्या पंचक्रोशीतच नव्हे तर सबंध महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्यप्रदेश, उत्तर हिंदुस्धानातही त्यांची नामवंत वैद्य म्हणून कीर्ती पसरली. प्रचंड आत्मविश्वास, आत्मनिर्भरता, प्रयोगशीलता यांच्या जोरावर १८८५ चे सुमारास त्यांनी सांगलीत पाय ठेवले, रोवले आणि आपल्या नैपुण्याने, दुर्धर, महादुर्धर रोगांवर मोठा नावलौकिक मिळविला. लोकमान्य टिळकांसारखा महामानवही त्यांचेकडे औषधोपचार घेत असे. एवढी गोष्ट त्यांच्या लोकोत्तरतेची साक्ष म्हणून पुरेशी आहे. ४०-५० वर्षांच्या अखंड सेवेनंतर १९३२ साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी १८९१-९२ पासून सुरू केलेला गणेशोत्सव लोकमान्यांपासून स्फूर्ती घेऊनच केलेला होता. आबासाहेबांचे दुसरे बंधु श्री. दामुअण्णा सांबारे निष्णात नाडीवैद्य म्हणून प्रसिद्ध होते. आबासाहेबांच्यानंतर त्यांचे सुपुत्र श्री. अप्पासाहेब यांनी वैद्य परंपरा १९५७ मध्ये मृत्युपर्यंत अखंड चालू ठेवली होती.


 
*ज्ञानदीप - मराठी वेबसाईट
 
      आतापर्यंत १०० वेबसाईट विकसित