१९४० ते ४२ पर्यंत मी बालशिक्षण मंदिराच्या शाळेत इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत होतो. त्या काळात आमच्या शाळेत एक प्रार्थनागीत होते. ते संस्थानच्या राजकवी साधुदास यांनी लिहिले होते. `हेरंबा अति सदया, सती पार्वती तनया, पटवर्धन वरदसुता` अशी ती रचना होती. त्याची चाल पोलिसी बँडच्या तालावर वाजवता यावी अशी होती. संस्थानाधिपती आप्पासाहेब पटवर्धन यांच्या रसिकतेचे, सर्वगुणसंपन्नतेचे द्योतक ठरेल असे ते एक प्रार्थनागीत होते. ते एक अशा तऱ्हेने रचलेले आणि म्हटले जाणारे किंवा बँडवर वाजविले जाणारे होते की संस्थानचा सारा इतिहास प्रजाजनांच्या डोळयासमोर तरळून जायचा. हे संस्थान कसे निर्माण झाले, कोणामुळे निर्माण झाले, या सार्या गोष्टींची जाणीवपूर्वक उत्सुकता सर्व प्रजाजनांच्या मनात यामुळे निर्माण होत असे. खर्या अर्थाने ते सोपे पण संस्थानाबद्दल उत्सुकता आणि राजघराण्याबद्दल आदर निर्माण करणारे प्रार्थनागीत होते. सांगलीचे संस्थान केंव्हा निर्माण झाले? त्याचे पहिले अधिपती कोण? असे अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. संस्थानचे गुणविशेष सांगणारा सारा इतिहास डोळयापुढे तरळू लागायचा.
पटवर्धन घराण्याची आराध्यदेवता `श्रीगणेश`. त्या श्रीगणेशाचेच हे संस्थान. सार्या पटवर्धनांची संस्थानिक म्हणून प्रस्थापना करणार्या पेशवे घराण्याची श्रद्धा या सदाशिवपुत्रावर म्हणजेच या मंगलमूर्तीवर होती. पटवर्धन घराण्याचे हरभट हे गणेशाचे महान उपासक होते. ते इकडे आले ते कोकणातूनच. त्यांनी दुर्वांचा रस प्राशन करून श्रीगणेशाची उपासना केली. मोठ्या भक्तिभावाने केलेली त्यांची ही उपासना लवकरच सफल झाली.
हे पटवर्धन घराणे पेशव्यांचे पाईक बनून सैन्यात सामील झाले. आणि लवकरच पेशव्यांचे सरदार बनून या दक्षिण महाराष्ट्राचे संस्थानाधिपती बनले. सरदार पटवर्धनांची ही उज्वल परंपरा महाराष्ट्राच्या सैन्यबळाला जवळजवळ पन्नास वर्षे प्रेरणा देत राहिली. पुण्यात गोपाळराव पटवर्धनांपासून पुढे ही परंपरा परशुरामभाऊ पटवर्धनांच्या काळापर्यंत अधिकच उज्वल होत होती. ही परंपरा इतिहास संशोधकांचा अभिमानविषय ठरली आहे. मिरजेच्या वासुदेवशास्त्री खरे यांच्या इतिहास संशेधनात पटवर्धन घराण्याचा इतिहास हाही एक महत्वाचा विषय ठरलेला आहे.

|