कालक्रमानुसार मूळ संस्थान तासगाव येथे होते. ते परशुरामभाऊ पटवर्धनांनंतर मिरज, बुधगाव, जमखंडी, कुरुंदवाड अशा ठिकाणी विभागले गेले. ही सारी स्वतंत्र संस्थानेच बनली. सांगली हे संस्थान त्यानंतर निर्माण झाले.
कालौघात ही सारीच संस्थाने रेसिडेंटच्या हुकमतीत गेली. सांगलीचा शैक्षणिक विकास प्रामुख्याने त्यानंतरच झाला. वेदशाळेपासून इंजिनिअर कॉलेजपर्यंत शैक्षणिक विकास झाला तो प्रामुख्याने या काळात झाला. अगदी आश्रमपद्धतीपासून महाविद्यालयांच्या बांधणीपर्यंतची कार्ये याच काळात झाली. त्याचप्रमाणे विलिनीकरण होण्याच्या काळातही संस्थानाधिपतींचे अमोल सहाय्य शैक्षणिक संस्थांना मिळाले आहे. सांगली हायस्कूलच्या बरोबरीने सिटी हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल या शाळा तसेच राणी सरस्वती कन्याशाळा यांची संवृद्धीही संस्थानाधिपतींनी केलेल्या अमोल साहाय्यानेच झालेली आहे. शैक्षणिकदृष्ट्या सांगलीचा उत्कर्ष याच काळात झालेला आहे.
सांगलीकरांचे ज्या शैक्षणिक संस्थांना सतत सहाय्य मिळाले त्या सर्वच संस्थातून सतत नामवंतांची निर्मिती होत गेली. उत्तम विद्यार्थी निर्माण होत होते त्याला कारण त्या सर्व संस्थातून उत्तम शिक्षकही लाभलेले होते. कै. पाटील गुरूजी, केशवराव दीक्षित, शंभुराव आपटे, कै.दतवाडकर गुरूजी असे नामवंत संस्कृत शिक्षक याच काळात आपापल्या संस्थातून काम करत होते.
याच काळात विलिंग्डन महाविद्यालय हेही सतत प्रगतीपथावर राहिले. त्यानंतर चिंतामणराव पटवर्धन कॉमर्स, वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजही याच काळात उभे राहिले. पुढे त्याच तोलामोलाचे शैक्षणिक कार्य कै. नामदार वसंतराव पाटील यांच्या अमोल साहाय्याने आजच्या शैक्षणिक संस्थांतून निर्माण झाले. त्यांच्यामुळेच खुद्द सांगलीत शांतीनिकेतन कॉलेज निर्माण झाले. सांगली हायस्कूल, कॉमर्स कॉलेज, आर्टस् सायन्स कॉलेज हे सर्व शैक्षणिक काम त्यांच्याच दिव्य प्रेरणेतून निर्माण झाले आहे. केवळ आर्थिकच नव्हे तर शिक्षण योजनेतूनही त्यांनी निर्माण केलेले हे काम अद्वितीय आहे.
 
|