मुख्य विभाग

स्वागतकक्ष आपली सांगली मिरजेतील संगीत परंपरा
मिरजेतील संगीत परंपरा पीडीएफ प्रिंट ई-मेल

मिरजेतील संगीत कला ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. मिरज संस्थान निर्माण झाल्यापासून व मिरजेचे राजे श्रीमंत दुसरे बाळासाहेब पटवर्धन संगीत प्रेमी असल्याकारणाने संगीत कलेला राजाश्रय मिळाला व या विद्येस लौकीक प्राप्त झाला.
मिरजेत एरंडोल गेट जवळ राहणार्‍या गोखले घराण्यास गवई गोखले असे संबोधले जाई. त्यांचे घराण्यातील महादेवबुवा गोखले हे प्रसिध्द गवई होऊन गेले. त्यांच्या घराण्यातील गायकी महाराष्ट्रात गोखले गाइकी म्हणून प्रसिध्द होती. सध्या त्यांच्या वंशातील श्री. प्रभाकर गोखले हे हार्मोनियम वादक आहेत. गोखले घराण्यातील कांही खास चिजा त्यांनी अद्याप प्रचलित ठेवल्या आहेत.


यानंतर बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे मिरज संस्थानात दरबारी गवई म्हणून बरेच दिवस राहिले. बाळकृष्णबुवांनी आपल्या वडिलांकडून व इतर अनेक गायकांकडून संगीत विद्या संपादन केली होती. बनारस, ग्वाल्हेर, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर, बेळगाव, धारवाड, हुबळी वगैरे अनेक ढंगातूनते गात. त्यांची शिष्य परंपरा मोठी होती. पं. विष्णू दिगंबर पलूसकर, पं. अनंत मनोहर जोशी, पं. वामनबुवा चाफेकर, निळकंठबुवा जंगम असे अनेक ख्यातनाम गवई त्यांनी तयार केले. एकदा विद्यार्थी म्हणून स्वीकार केल्यावर ते पाच-पाच तास विद्यार्थ्यांकडून रियाज करून घेत असत व एक-एक तानेचा पलटा पाचशे-पाचशे वेळा घटवून घेत. त्यामुळे विद्यार्थी आपोआपच घोटून तयार होत असे. पुढे त्यांचे पत्नीचे निधनानंतर त्यांचे मन मिरजेत रमेना म्हणून ते पुन्हा इचलकरंजीस गेले.


यानंतरच्या काळात भास्करबुवा बखले मिरजेस काही दिवस वास्तव्यास होते. भास्करबुवांचे गाणे चतुरंग असे. पिळदार आवाज त्यामुळे गाण्याची बैठक रंजकत्व करून जाई. बालगंधर्वांचे कंपनीचा मुक्काम बरेच महिने मिरजेत असल्याने अनेक नाट्यसंगीताना भास्करबुवांनी सूरबध्द, लयबध्द व तालबध्द केले व शिष्यही तयार केले.

याच काळात संगीतरत्न अब्दुल करीम खाँ मिरजेस वास्तव्यास आले. त्यांना संत मिरासाहेब यांचा साक्षात्कार झाल्याने ते दर्ग्यात उरसाचे वेळी दरवर्षी चिंचेच्या झाडाखाली बसून गान सेवा करीत असत. खाँ साहेबांचा आवाज अत्यंत पातळ व तानेची फिरत तीनही सप्तकांत सहजपणे फिरणारी होती. प्रत्येक सुराचे वजन व लय पाहून ते आलापी करीत. त्यामुळे त्यांचे श्रोत्यांस मंत्रमुग्ध करीत असे. खाँ साहेब हे मोकळेपणाने आपली विद्या विद्यार्थ्यांस शिकवीत. त्यामुळे पं. रामभाऊ कुंदगोळकर, सवाई गंधर्व, पं. बाळकृष्णबुवां कपिलेश्वरी, पं. संगमेश्वरबुवा गुरव, गानकोकिळा हिराबाई बडोदेकर, श्री. सरस्वती राणे, संगीतकार राम कदम आदी अनेक शिष्य त्यांनी तयार केले.मध्यंतरीच्या काळात पं. वामनबुवा चाफेकर यांनी नाथबुवामुश्रीफ यांच्या कन्येस प्रभाताई मुश्रीफ(फडके) यांना संगीताचे शिक्षण देऊन तयार केले होते.


इकडे पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांनी भारत दौरे व संगीताच्या बैठकी करून ग्वाल्हेर घराण्याची गाईकी भारतभर पसरवली व अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्याललयाची स्थापना करून भारतभर त्याची उपकेंद्रे स्थापन करून गानविद्येला सुसूत्रपणा आणला. संगीताची लिपी तयार करून सुशिक्षित समाजात गाण्याचा प्रसार केला. याच काळात निळकंठबुवां जंगम यांनी मिरजेत संगीताचे शिक्षणाची संगीत शाळा सुरू केली. ते कन्या शाळेच्या बोळात रहात असत व पिसे यांच्या गादी कारखान्या समोरच्या करमरकरांच्या माडीवर संगीत शिकवत असत. पंडित मल्लिकार्जून मन्सूर हे याच ठिकाणी गाणे शिकत असत.

--डॉ. गोविंद चिंतामण तथा बापूसाहेब करमरकर