मुख्य विभाग

स्वागतकक्ष आपली सांगली सांगली आणि सांगलीकर
सांगली आणि सांगलीकर पीडीएफ प्रिंट ई-मेल

सांगली आणि सांगलीकर हे पुस्तक श्री. अविनाश टिळक यांनी पूर्वार्ध, उत्तरार्ध आणि परिशिष्ट अशा तीन भागात लिहिले आहे. पूर्वार्धात सा रम्य नगरी या प्रकरणात सांगली नगरीचा इतिहास सांगितला आहे. सांगली नाव कसं जन्माला आलं इथंपासून दोनशे वर्षाचा इतिहास, सांगली नगरीची सर्वांगाने झालेली जडण-घडण, औद्योगिक, सांस्कृतिक विकास यांचा धावता आढावा घेतला गेला आहे.

दुसरा भाग हा खरा पुस्तकाचा आत्माच आहे. संथ वाहणार्‍या कृष्णा नदीच्या सांगली परिसरात, सांगलीचं नाव महाराष्ट्रात, भारतवर्षात आणि काही प्रमाणावर जागतिक स्तरावर उज्वल करणारी अनेक लहान थोर माणसं आपल्या कर्तृत्वाचा ठसा विविध क्षेत्रात उमटवून गेली आणि अजून उमटवित आहेत. एके काळी नगण्य असणार्‍या सांगलीला चेहरा-मोहरा कुणामुळे मिळाला असेल तर तो प्रथम १८०१ साली सांगली ही आपल्या संस्थानाची राजधानी बनवणार्‍या थोरल्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्यामुळे. पुढे थोरल्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धनांच्या दूरदृष्टीमुळे व उदार धोरणामुळे सांगलीची खरी भरभराट झाली. या दोघांच्या पायाभरणीवर खरा कळस चढविला तो लोकनेते चार वेळा महाराष्ट्रराज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवणार्‍या सांगलीच्या वसंतदादा पाटील यांनी. त्यांच्या कर्तृत्वामुळे सांगलीचं नाव महाराष्ट्रात आणि काही प्रमणात संपूर्ण देशात गाजले. सांगली नाट्यपंढरी म्हणून ख्यातकीर्त आहे.

मराठी रंगभूमीला जन्म दिला तो १८४३ साली सीता स्वयंवर या पहिल्या नाटकाचा प्रयोग करणार्‍या विष्णुदास भावे यांनी. त्याचप्रमाणे मराठी रंगभूमीला सुवर्णकाळ बघायला मिळाला तो सांगलीच्याच गोविंद बल्लाळ देवल आणि कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर या दोन नाट्याचार्यांमुळे. याच नाट्यक्षेत्रात मामा पेंडसे, मा.अविनाश अशा नटश्रेष्ठ्यांमुळे सांगलीच नांव गाजवलं. मराठीमध्ये पहिले ज्ञानपीठ पारितोषिक मिळवले ते सांगलीच्याच वि.स.खांडेकरांनी . नंदू नाटेकर आणि विजय हजारे याच्यामुळे तर सांगलीची कीर्ती जागतिक स्तरावर पोचली. याशिवाय संतश्रेष्ठ कोटणीस महाराज, शीघ्रकवी साधुदास, कथालेखक श्री.दा.पानवलकर, उद्योगरत्न धनी वेलणकर , वैद्यकशास्त्रातील चमत्कार समजले जाणारे आबासाहेब सांबारे ही कर्तृत्ववान माणसं सांगलीचीच. मंगेशकर मंडळीच्या वास्तव्यानं सांगली संगीत क्षेत्रातही गाजली. अशा २२ कर्तृत्ववान सांगलीकरांचा रसरशीत ओघवत्या भाषेतील परिचय या उत्तरार्धात आहे.


याखेरीज आर्थिक मर्यादेमुळे ज्या सांगलीकरांचा विस्तृत परिचय पुस्तकात देता आला नाही अशा सांगलीकरांचा उल्लेख परिशिष्टात आणखी काही सांगलीकर या लेखात आला आहे. सांगलीतील काही नामवंत संस्थांची आणि सांगली परिसरातील काही नामवंत संस्थांची आणि सांगली परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती परिशिष्टात आली आहे. याहून उल्लेखनीय बाब म्हणजे सांगलीच्या इतिहासातील गेल्या २०० वर्षातील महत्वाच्या घटना कालपटात देण्यात आल्या आहेत. संपूर्ण ३०० पानी पुस्तकात सांगलीचे जुने वैभव दाखवणारे कृष्णधवल आणि काही रंगीत अशी ४० छायाचित्रे या पुस्तकात आहेत.
मराठीतील ज्येष्ठ समीक्षक प्रा. म.द.हातकणंगलेकर यांची मर्मग्राही प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे.


सांगली नगरवाचनालयातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची किंमत फक्त रु १५०/- इतकी आहे.
'सांगली आणि सांगलीकर'- लेखक अविनाश टिळक १/८, राजवाडा, सांगली ४१६४१६.