मुख्य विभाग

स्वागतकक्ष आपली सांगली माझं गांव ‘सागांव’
माझं गांव ‘सागांव’ पीडीएफ प्रिंट ई-मेल
लेखक- श्री निवास दादू लोखंडे, सागांव

(प्रथम पारितोषिक प्राप्त निबंध)


“ हे गाव लय न्यारं
इथं वाहतय ज्ञानाचं हो वारं ”

      असं सर्वश्रुत असणारं, वारणेच्या कुशीत व सहा गावांच्या मुशीत वसलेलं, शिराळ्यापासून अवघ्या १२ कि.मी अंतरावर इड्यावरच्या सुपारीच्या खांडाप्रमाणे असलेलं माझं गांव ‘सागांव’.

तालुक्याच्या राजकारणाला योग्य कलाटणी देणारं, कोल्हापुर जिल्ह्याच्या शिवेला-शिव लागून असलेलं सागांव. हे गांव राजकीय, सामाजिक, कृषी, शिक्षण या क्षेत्रात तालुक्यात मानबिंदू ठरलेलं आहे. आजही गावात गावच्या पांढरीतली तत्व पाळणारी, आयुष्य वाकाच्या दोऱ्या वळवण्यात गेलेली व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या खांद्याला खांदा लावून जनजागरण  केलेली व आजही ८० व्या वर्षी एकतारी व चिपळ्याच्या आवाजाने रात्र जागवणारी ‘हिंदूराव सातपुते’ (आबा) यांच्या सारखी माणसं माझ्या गावच्या मातीत आहेत.

गावात ग्रामपंचायतीची स्थापना २९/०३/१९५४ ची. कै. केशवराव श्रीपती पाटील यांच्या रुपाने गावाला पहिले सरपंच मिळाले. कै. पांडुरंग कोंडी पाटील, कै. दादा गणपती पाटील यांच्या वैचारिक अधिष्ठानावर गावाने उत्तरोत्तर प्रगती केली आहे. ग्रामपंचायतीस सन-१९९९ साली ‘जिल्हास्तरीय’ ग्राम स्वच्छ्ता अभियानात दुसरा क्रमांक मिळाला आहे. सध्या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी २४ लाख रुपये खर्चून ग्रामसचिवालयाची इमारत उभी आहे. दक्षिणेकडून वाहणाऱ्या ‘वारणामाई’ च्या कृपेने इथल्या बळीराजाने हरितक्रांती बरोबर धवलक्रांती करुन राज्य पातळीवरील अनेक बक्षिसांची लयलुट केली आहे. प्रगतशील शेतकरी श्री. सुखदेव माने यांना सन १९९७ साली ‘भात पीक स्पर्धेत’ प्रथम क्रमांकाबद्द्ल तल्कालिन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते गौरण्यात आले. गावात निर्मल ग्राम योजनेतून ८५५ शौचालय असून सध्या गावाला जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा करणारी सुमारे १ कोटी ची योजना कार्यान्वित झाली आहे. गावातील बचतगटांच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम मिळाल्याने त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या आहेत.

राजकिय दृष्टीकोनातुन विचार केल्यास शिराळा विधानसभेचे नेतृत्व केलेले कै. आमदार भगवानराव पाटील (तात्या) हे सागांवचेच. त्यांच्या प्रयत्नातून वारणा नदीवर झालेला पुल हा सागांव-सरुड (ता.शाहूवाडी) यांच्यातील दुवा ठरलेला आहे. आज गावात माजी आमदार शिवाजीराव नाईक, विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक (भाऊ), सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विचाराने गांव विकास करणारे गट आहेत.

गावात वैद्यकिय सुविधा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकिय दवाखाना, निरंतर शिक्षण केंद्र, ग्राहकांच्या सेवेसाठी वारणा बझार व बालाजी बझार आहे. सहकारी तत्वावर असणाऱ्या भैरवनाथ दुध, दत्त दुध, नागाबाबा दुध, वसंतदादा दुध, लक्ष्मी दुध इ. संस्था असून दररोज ५ हजार लीटर दूध सकलन केले जाते. आर्थिक व्य़वहार पाहणेसाठी पतसंस्था बरोबरचं जिल्हा मध्यवर्ती बॅंक, युनियन बॅंक, शिराळा अर्बन बॅंक यांच्या शाखा असून त्याचा शेतकऱ्याला उपयोग होतो.

शैक्षणिकदृष्ट्या गावाची प्रगती उल्लेखनीय आहे. गावांत समाज विकास विद्यालयासारखे सर्व सोयींनी सुसज्ज विद्यालय त्याचबरोबर वारणा विद्यालय, डी.एड.कॉलेज, प्राथमिक शाळा आहेत. अंगणवाड्यांचे काम उल्लेखनीय असून अंगणवाडी क्र.११२ ला सन २००३-०४ चा ‘उत्कृष्ट अंगणवाडीचा’ पुरस्कार देवून माजी आम. विलासराव शिंदेंनी गौरव केला आहे. गावातील तरुणांनी वैद्यकिय क्षेत्रापासून ते प्रशासनापर्यंत गरुडझेप घेतली आहे. डॉ. हर्षल सागांवकर, डॉ. श्रीकांत सागांवकर, डॉ. शशिकांत सागांवकर, डॉ. जयवंत सागांवकर, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. युवराज पाटील ही मंडळी वैद्यकीय सेवा देत असून संजय तिके, भाऊसो लोखंडे, आबासो परीट, प्रदिप पाटील, उद्य मिंचेकर, संदिप व सागर पाटील हे जवान भारतमातेचे रक्षण करत आहेत. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन पंकज पाटील हे आयुक्त तर विश्वास पाटील, पूनम आसवले, तेजस्वीनी पाटील हे पोलिस उपनिरिक्षक झाले आहेत.

“भैरवनाथ हे गावचे ग्रामदैवत असून सध्या लोकवर्गणीतून २२ लाख रुपये खर्च करुन जिर्णोध्दाराचे काम सुरु आहे. त्याचबरोबर श्री. हनुमान मंदिर, श्री. महादेव मंदिर, श्री. संत गजानन मंदिर, श्री. कृष्ण मंदिर इ. देवालय असून वर्षभरात प्रत्येक मंदिरात एकदा अखंड हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण होत असते. एकूणच गौरी-गणपती सणामध्ये गौरी गीते गावून रात्र जागवणाऱ्या, कुण्या नववधूच्या दुरड्या सोडून लांबलचक नांव घेवून लग्नमंडप गाजवणाऱ्या आया-बहिणींचं तर दसऱ्यात “भैरुबाच्या नावानं चांगभल” चा गजर करणाऱ्या मराठमोळ्या माणसांचा माझा गांव ‘सागांव’ मला खूप प्रिय आहे.

गावाबद्द्ल शेवटी एवढेचं म्हणावेसे वाटते-

!! वारणामाईच्या तिरी ! भैरवनाथाच्या मंदिरी !!
जळतात तेला-तुपाच्या वाती
गुण्यागोविंदाने नांदतात
माझ्या गावात अठरा पगड जाती
अठरा पगड जाती !!