मुख्य विभाग

स्वागतकक्ष आपली सांगली कृषी क्षेत्रातून प्रगती साधणारी - फारणेवाडी
कृषी क्षेत्रातून प्रगती साधणारी - फारणेवाडी पीडीएफ प्रिंट ई-मेल
लेखक- श्री. संजय गणपती साळुंखे, मु. फारणेवाडी (शि)

(द्वितीय पारितोषिक प्राप्त निबंध)

वाळवा तालुक्याच्या दक्षिण बाजुस कृषी क्षेत्राच्या माध्यमाद्वारे प्रगतीची पावले उमटविणारे आणि प्रगत साधत गावच्या विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणजे फारणेवाडी(शि) होय.

आष्टा ते वडगाव रस्त्यावरील शिगांव पासुन पश्चिम बाजूस २ कि.मी. अंतरावर असलेल्या फारणेवाडीच्या सभोवताली रमणीय अशी हिरवीगार झाडी आहे. गावामध्ये राजकारणापेक्षा सामाजिक कार्याला प्राधान्य दिले जाते. गावची लोकसंख्या १२०० इतकी आहे. गावच्या उत्तर बाजूस असणाऱ्या लक्ष्मी मंदिराचे देवालय सौंदर्यात भर टाकत आहे. गावामध्ये अलिकडच्या काळात बऱ्याचशा सुधारणा झाल्या आहेत. हनुमान व विठ्ठल-रखुमाई मंदिर आहे. या मंदिरात श्रावण महिन्यात पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यामध्ये तरूंणापासून ते वृध्दांपर्यंत सर्वजण सामील होतात. चैत्र महिन्यात गुढीपाडव्यादिवशी लक्ष्मीची मोठी यात्रा भरते. एकंदरीत धार्मिक व अध्यात्मिक विचाराचा वारसा लाभल्याने हे गाव भक्तिमय झाले आहे असे म्हटले पाहीजे.

फारणेवाडी या गांवास फारणेवाडी हे नांव पडण्यास कारणही तसेच घडले. या गावचे लोक मुळचे शिगांवचे रहिवासी होते मात्र त्यांची कसण्याची शेती दूर असल्यामुळे ते शेतातच वस्ती करु लागले हे वस्ती करणारे लोक फारणे आडनावाचे होते. त्यामुळे त्या वस्तीस फारणेवाडी असे नांव पडले. हळूहळू या गावचा विस्तार होत गेला आज या गोष्टीस दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. गावच्या विकासात कायापालट होण्यास शेती व प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय यांची साथ लाख मोलाची ठरली आहे. गावापासुन २ कि.मी अंतरावरुन वारणा नदी वाहत असल्याने पाण्याचा प्रश्न येत नाही उद्योगधंद्यांची संख्या कमी असली तरी गावातील तरुन भरपूर पाणी असल्यामुळे ऊसाबरोबर भुईमुग ज्वारी गहू, हरभरा, सोयाबीन कडधान्ये भाजीपाला यासारखी पिके घेतली जातात.

गावाला पिण्यासाठी विहीर नळपाणी पुरवठा योजना बोअरच्या पाण्याचा वापर केला जातो वारणा नदीवरुन लक्ष्मी जलसिंचन योजना शेतीसाठी आणली आहे. त्यामुळे सर्व शेती ओलिताखाली आली आहे. येथील ऊस वारणा साखर कारखाना व राजारामबापू साखर कारखाना येथे पाठवला जातो. एकंदरीत गावावरती वारणामाईचे (नदी) अनंत उपकार आहेत.

गावामध्ये एक लेझीम मंडळ दोन-तीन तरुण मंडळे, भजनी मंडळ, झांजपथक आहेत. एक सरकार मान्य स्वस्त दुकान आहे. गावामध्ये रस्ते डांबरीकरण, गटारी प्राथमिक शाळेसाठी दोन खोल्या, कंपाउंड हे सर्व आमदार फंड अश्वासित रोजगार योजनेतून बांधून पूर्ण करण्यात आले आहे.

सध्या हे गाव १००% हगणदारीमुक्त झाले आहे त्यामुळे ‘निर्मलग्राम’ पुरस्कार आणि महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात भाग घेवून १००% तंटामुक्त गांव करुन ‘तंटामुक्त पुरस्कार’ हे दोन पुरस्कार मिळाले आहेत. या दोन्ही योजनांचा मी स्वत: सचिव आहे.
शिक्षणाबाबतीत गावामध्ये प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करणारे कै. गणपती ज्ञानू साळुंखे (गुरुजी) या गावचे. कलाक्षेत्रात या गावचे शाहीर दौलतराव खोत यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक खेड्यापाड्यातून पोवाड्याचे कार्यक्रम केले ते आजही सर्वपरिचीत आहेत. क्रिडा क्षेत्रात ही गांव आघाडीवर आहे. गावातील बरेचसे तरुण जिल्हा व तालुका पातळीवर झळकले आहेत. एकीकडे सुविधा असल्यातरी एकीकडे सुविधाचा अभाव प्रकर्षाने जाणवतो त्यामुळे हे गांव एस.टी सेवा व पोष्टकार्यालय यांच्यापासून वंचित आहे पोष्ट कार्यालय नसल्यामुळे पोष्टाची सर्व कामे मंदगतीने चालतात. एस.टी दिवसातून एकवेळ येते त्यामुळे एस.टी. साठी आस-पासच्या खेड्याकडे धाव घ्यावी लागते. या सुविधा गावचे नेते खेचून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

गावामध्ये गट-तट अस्तित्वात असले तरी विकासकामे करताना हे गट-तट ग्रामस्थांच्या लक्षात सुध्दा रहात नाही काहीही असो. गावच्या ग्रामस्थांमध्ये एकोपा असल्याने भविष्यात या गावाची प्रगती निश्चित होईल आहे त्यात समाधान मानणारं गांव म्हणजे फारणेवाडी असं आहे यात शंका नाही.