मुख्य विभाग

स्वागतकक्ष साहित्य लेख भाजी भाजीचा खेळ
भाजी भाजीचा खेळ पीडीएफ प्रिंट ई-मेल
लेखन सौ. शुभांगी सु. रानडे   
कालचा भातुकलीचा खेळ अनुषाला फारच आवडल्याने आज ती परत तसेच खेळण्याविषयी म्हणणार असे मला वाटले होते आणि झालेही तसेच. दुपारची जेवणे झाल्यावर सर्वांना वामकुक्षी लागल्यावर अनुषा हळूच माझ्याकडे आली आणि म्हणाली, “ आजी, आज पुन्हा खेळूया का कालच्यासारखा भातुकलीचा खेळ ? “ माझ्या होकाराची वाट न बघताच ती त्या तयारीलाही लागली. ते पाहून मला एकदम हसूच आले. मी म्हटले, “ अनुषा, आज कि नाही भातुकलीऎवजी त्याच प्रकारचा पण जरा वेगळा खेळ खेळूया. “ वेगळा म्हणजे कोणता हे ऎकण्याची उत्सुकता तिच्या चेहर्यावर स्पष्टपणे दिसत होती. मी अधिक ताणून न धरता भाजी भाजी खेळूया असे सुचविले. माझ्या या नवीन खेळाच्या कल्पनेने ती अगदी चक्रावलीच. “ पण म्हणजे कसे खेळायचे ते मला माहीत नाही. “ “ भाजी म्हणजे खरी भाजी नव्हे बरं का. आपल्या अंगणात निरनिराळी फळाफुलांची झाडे आहेत ना त्यांच्या पानांचा उपयोग करूया. “

मग आम्ही फुलांची परडी घेतली. त्यात जाई, जुई, कोरांटी, मधुमालती इत्यादी फुलझाडांची प्रत्येकी पाच सात पाने घेतली. सीताफळ रामफळ, डाळिंब अशा फळझाडांची पानेही तोडून घेतली. “अनुषा, पाने तोडायची म्हणजे ओरबाडायची नाहीत हं. नाहीतर त्या झाडांना वाईट वाटते. रडू सुद्धा येतं .म्हणून हळूहळू तोड हं. “ असे मी म्हणताच अनुषा खुदकन् हसली व म्हणाली, “ आजी झाडांना काय कळतं का ? ती कधी रडतात का ? तुझं आपलं काहीतरीच ! “ हो कळतं तर ! त्यांच्याशी प्रेमाने बोलले, हळुवारपणे त्यांच्यावरून हात फिरवला तर त्यांना आनंद होतो. पण त्याऎवजी हातात कात्री किंवा काठी घेऊन त्यांना उगाच झोडपून काढले तर वाईटही वाटतं बरं का. झाडांनाही जीव असतो म्हटलं. म्हणून त्यांच्याशी गोडीने वागावे. “ माझे हे बोलणे ऎकताच अनुषाने प्रत्येक झाडाजवळ जाऊन ’ सॉरी ’ म्हणून त्याला दुखले नाहीना अशी चौकशी केली. व पुढची पाने अलगद हाताने “ ह्ळू तोडते हं “ असे त्या झाडाला सांगून तोडली.

गोकर्णाच्या वेलाला शेंगा लागल्या होत्या तसेच अबोलीच्या बियांच्या पण होत्या. त्या घेतल्या. गुलबाक्षीची पाने व काळ्या बियाही घेतल्या. इतक्यात ती गुलाबाच्या झाडाची पाने घ्यायला गेली. तशी त्या झाडाला काटे असतात. टोचेल म्हणून घ्यायला नको ती पाने. हे ऎकताच “ या झाडाला काटे का असतात ? “ अनुषाने विचारले. “ अगं गुलाबाची फुलं फार सुंदर असतात ना तेव्हा ती कोणी तोडू नयेत असे त्या झाडाला वाटतं त्यामुळे संरक्षणासाठी त्याला काटे असावेत असं मला वाटतं “ “तुला कसं कळलं गं ? “ इति अनुषा. “ माझी आपली कल्पना गं. त्या झाडाला काय वाटत असेल असा विचार करताना मीच जणू ते झाड झाले. म्हणून मला त्याच्या मनातले विचार समजले. “ या माझ्या उत्तराने आपणही इतरांच्या मनाचा हळुवारपणे विचार करावा असे अनुषाला वाटले. अशा रीतीने परडीभर पाने व काही छोटे मोठे दगड घेऊन आम्ही घराच्या व्हरांड्यात आलो.

“आजी, एवढ्या पानांचं काय करायचं गं ? “ अनुषाने विचारले. “ अगं अनुषा, तीच तर गंमत आहे ! “ मी म्हणाले. त्यानंतर मी एक वर्तमानपत्र घेऊन ते पसरले. त्यावर वेगवेगळ्या प्रकारची पानांचे ढीग केले. मग अनुषालाच एक कल्पना सुचली.स्वयंपकघरात जाऊन तिने छोट्या मोठ्या ताटल्या आणल्या. त्यात ती वेगवेगळ्या प्रकारची पाने ठेवली. अनुषाने खेळातले सागरगोटेही आणले. छोटे मोठे दगड वेगवेगळ्या ताटल्यात ठेवून “ हे आपले कांदे, बटाटे व टोमॅटो बरं का “ असे मी सांगितले. यावर तिने कल्पना लढवली व पाने म्हणजे वेगवेगळ्या पालेभाज्य़ा असे सुचवले. पण तिला पालेभाज्या ओळखतही नव्हत्या व त्यांची नावेही माहीत नव्हती. “अगं, त्या आपल्या चुका चाकवत, मेथी, अळू, माठ, राजगिरा, इत्यादी पालेभाज्या बरं का. आणि ही लहान लहान पानवाली म्हणजे कोथिंबीर बरं का. “ शेंगाही वेगळ्या मांडल्या. अंगणात जाऊन तिने जरा थोडे मोठे दगड आणले. त्यांना कोबी, फ्लॉवर, भोपळा अशी नावे दिली. अखेरीस सर्व प्रकारच्या भाजीची मांडामांड करून झाली.

“ अनुषा आम्ही लहान असताना सुद्धा हा खेळ मोठ्या आवडीने खेळायचो. आणि भाजीचे वजन करण्यासाठी लागणारा तराजूही घरीच बनवायचो. “ “मग मलाही शिकवशील का तो करायला ? “ तिने विचारले. “ हो हो. त्यात काय एवढसं ! एकदम सोप्पा आहे गं.” नंतर आम्ही जुन्या कॅलेंडरची पाने काढून उरलेली पत्र्याची पट्टी घेतली. तिला मधोमध धरायला दोर्याचा हूक तयार होताच. दोन हिंगाच्या जुन्या डब्या शोधल्या. पण त्या काही सापडेनात म्हणून पुट्ठ्याची दोन लहान खोकी घेतली. त्यांच्या खालच्या भागाला त्रिकोणी आकारात तीन भोके पाडली व त्यातून तीन दोरे ओवून त्यांची वरची टोके तराजूच्या दांडीच्या दोन्ही कडेला बांधली. तराजू झटपट तयार झाला म्हणून अनुषाला फार आनंद झाला.

“ आता म्हणे मी पहिल्यांदा भाजीवाली होते. आणि तू म्हणे भाजी विकत घेणारी ताई, माई, वहिनी,आक्का अशी कोणीही हं ! पुढच्या वेळी तू भाजीवाली हो आणि मी होईन ती विकत घेणारी बाई. चालेल ना ? “ दोन मिनिटातच अनुषा ताई बनून हाता एक पिशवी व पैशाची छोटी पर्स घेऊन आली. नोटा म्हणून तिने कागदाच्या लहान तुकड्यांवर ५, १०, २०, ५० असे आकडे लिहिले. जुनी नाणी २, ५, १० व २५ पैशांची सध्याच्या व्यवहारात वापरत नसलेली नाणीही घेतली. तिला येताना पाहून मी भाजीवालीच्या सुरात म्हटले, “भाजी घ्या भाजी. ताजी ताजी भाजी.” असे म्हणून मी गिर्हाईक आपल्याकडे वळवायला सुरुवात केली. अनुषाताई माझ्याकडे म्हणजे भाजीवालीकडे भाजीची विचारपूस करण्यासाठी आली. तिने कांदे व बटाट्याची किंमत विचारली. “ताई, घ्या ना. बटाटे स्व आहेत फक्त २० रुपये किलो. पण कांदे मात्र अजून महागच आहेत हं. ५० रुपये किलो. तेव्हा तिने एक किलो बटाटे व अर्धा किलो कांदे घेतले. मी तराजूत वजन करून तिच्या पिशवीत घातले. आणि म्हटले,” ताई पालेभाजी पण घ्या ना. आत्ताच ताजी ताजी आणली आहे. तसेच फ्लॉवर कोबी पण आहे. कोबॊ १० रुपयाला एक गड्डा व फ्लॉवर १५ रुपयाला एक. कोबीचा एक गड्डा घेतला व मेथीच्या भाजीची चौकशी केली व कोथिंबीरीचीही एक पेंडी देण्यास सांगितले. “ ताई, ही घ्या गोल पानांची मेथी म्हणजे ती कडू नसते. आणि कोथिंबीरही फुलवाली न घेता भरदार पानांची घ्या म्हणजे ती कोवळी असते. “माझ्या ह्या बोलण्यावर खूष होत तिने एक मेथी व एक कोथिंबिरीची पेंडी घेतली व हिशोब करू लागली. पण मी म्हणजे भाजीवालीने चटकन् झालेले भाजीचे पैसे सांगितल्यावर अनुषा म्हणाली, “ अहो भाजीवालीबाई, तुम्ही तर शाळेत पण जात नाही मग पैशाचा हिशोब इतक्या झटकन् कसा काय केलात ? तुम्हाला पाढे व गणित येतं का ? “ “ नाही हो ताई. शाळा कुठली अन् काय भाजी विकायला बसणे हीच आमची शाळा. आमची आई पण भाजी विकायची. तिच्याबरोबर भाजी विकता विकता आम्हालाही यायला लागले हळूहळू सारे काही. “ नंतर अनुषाताई भाजी घेऊन आपल्या खोट्याखोट्या घरी गेली.

पुढच्या पाच मिनिटातच आमच्या भूमिकांची अदलाबदल झाली. अनुषा भाजीवाली झाली. मी पिशवी घेऊन भाजी विकत घ्यायला आले. “ अहो आजीबाई, भाजी घ्या की. ताजी ताजी आहे. “ भाजीवालीने आपला सूर लावला. मी कांदे, बटाटे, दुध्या इत्यादी भाज्यांची किंमत विचारली. तसेच पालेभाजीही हातात घेऊन नीट निरखून पाहिली. चाकवत चांगला होता म्हणून त्याची किंमत विचारली. चाकवत १० रूपये व कोथिंबीर पेंडी ५ रूपयाला होती ती घेतली. बटाटे एक किलो व कांदे अर्धा किलो घेतले. अनुषाने तराजू उचलून त्याच्या एका पारड्यात एक किलोचे वजन म्हणून एक दगड ठेवला व दुसर्या पारड्यात बटाटे म्हणून सागरगोटे घातले. मी बटाटे चांगले बघून घालण्यास सांगितले. हि८रवे बिरवे घालू नका म्हणून सांगितले. भाजीवालीने – म्हणजे अनुषाला तराजूत वजन कारायला मिळाल्याने झालेला आनंद मला दिसत होता. तसेच भुईमुगाच्या शेंगाही अर्धा किलो घेतल्या. ४० रूपये किलो होत्या. ह्या शेंगा नुसत्या सोलून खाता कि काय ? या भाजीवालीच्या शंकेचे मी पटकन् निरसन केले. मी म्हटले “ काही शेंगा स्वच्छ धुऊन थोड्या ठेचतो. त्यात चवीपुरते मीठ व शिजायला पाणी घालून कुकरमध्ये चांगल्या उकडून घेतो. मग शिजल्यावर आतले दाणे मऊमऊ व चवीला फार सुंदर लागतात. उरलेल्या शेंगा कच्च्याच कढईत घालून गॅसवर भाजून घेतो. पूर्वी चुलीत किंवा फुफाट्यात घालून भाजायचे ना तशाच. ते भाजलेले दाणेही खमंग लागतात बरं का.” नंतर पैशाचा हिशोबही करून देवाणघेवाण झाली.

अशा रीतीने पिशवीत भाजी घेऊन मी घरी आले. हा भाजी भाजीचा खेळही अनुषाला फार म्हणजे फारच आवडला. “अनुषा, फळभाज्या, पालेभाज्या, अगदी शेंगाही – तुला आवडतात त्या मटारच्या शेंगा पण हं – वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. तसेच बीट, मुळा, गाजर यासारखी कंदमुळे अशी अनेक प्रकरची भाजी असते. सध्या शहरात भाजांची दुकाने असतात. परंतू लांबलांब राहणार्या लोकांना सोपे पडावे म्हणून वेगवेगळ्या दिवशी त्या त्या ठिकाणी भाजीचा बाजारही भरतो. तेथे शेतकरी, भाजीविकणारे आपापला माल म्हणजे भाजी वगैरे घेऊन विकायला बसतात. बाजारात नुसता फेरफटका मारणे सुद्धा खूप आनंददायक असते. ताजी हिरवीगार भाजी बघून ही घेऊ का ती घेऊ असे होऊन जाते. उद्या बुधवर आहे. आपल्यायेथे उद्याच भाजीबाजार भरतो. तू पण ये हं माझ्याबरोबर भाजीला. म्हणजे तुलाही कोणती भाजी किलोवर तर कोणती पेंडीवर किंवा नगावर घ्यायची ते हळूहळू समजेल. “ माझे म्हणणे ऎकल्यानंतर ती म्हणाली, “ आजी, हे तुझे बोलणे ऎकून सगळा बाजारच जणू माझ्या डोळ्यांपुढे आला. पण आमच्या येथे असा बाजार भरत नाही म्हणून आमची आई मॉलमध्ये जाते भाजी आणायला. मी जात जाईन तिच्याबरोबर. “
आईने बोलावल्यामुळे आम्ही दोघी भानावर आलो. चहाचा वास आम्हाला बोलावत होता. चहाबिस्किटांचा समाचार घेण्यासाठी आम्ही दोघीही स्वयंपाकघराकडे वळलो.